Disha Shakti

राजकीय

अंगणवाडी सेविकांचे माजी मंत्री कर्डिले यांना निवेदन

Spread the love

राहुरी  प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : अंगणवाडी सेविका या महागाईच्या काळात १० हजार रुपयाच्या मानधनावर काम करत असून लहान बालकाला घडवण्याचे काम करत असतात. ज्ञानदानाच्या कामासोबतच शासनाच्या विविध उपक्रम राबवण्याची जबाबदारी देखील पार पाडत असतात. त्यांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करत त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी दिली.

अंगणवाडी, बालवाडी सेविका, मदतनीस, कर्मचारी राज्यव्यापी बेमुदत संपावर गेल्या असून त्यांनी माजी मंत्री कर्डिले यांची भेट घेऊन आपल्या मागणीचे निवेदन देत १० डिसेंबर रोजी नागपूर अधिवेशनात धडकणार असल्याचा इशारा दिला. यावेळी भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले, बाजार समिती सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सूळ, सुमन सप्रे, स्मिता औटी यांच्यासह जिल्हाभरातील अंगणवाडी, बालवाडी सेविका, मदतनीस, कर्मचारी उपस्थित होते.

शासनाने दखल घेण्याची मागणी संघटनेच्या आव्हानानुसार बेमुदत संपात अहमदनगर जिल्ह्यातील ४ हजारच्या वर तर महाराष्ट्रातील १ लाखावर संख्येने कर्मचारी सहभागी होणार आहे. त्यामुळे शासनाचे काम रेंगळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. तत्पूर्वी शासनाने या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकरिता होणाऱ्या आंदोलनाची तत्काळ दखल घ्यावी, अशी मागणी आयटक संघटना व कृती समितीने केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास १० डिसेंबर रोजी नागपूर अधिवेशनात धडकणार, असा इशारा देखील निवेदनातून देण्यात आला.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!