Disha Shakti

राजकीय

महायुतीच्या बैठकीला अजित पवार गटाच्या आमदारांची दांडी ; विखे पाटलांनी धरले पक्षाच्या समन्वयकांना जबाबदार

Spread the love

विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण  : लोकसभा निवडणुकीच्या अहमदनगर जिल्ह्यातील दोन्ही जागांसाठी महायुतीत इच्छूक उमेदवारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे अंतर्गत राजकीय डावपेच सुरू असतानाच आज झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या चारपैकी तीन आमदारांनी दांडी मारली. सोबतच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची आणि भाजपच्या माजी आमदाराची अनुपस्थिती खटकली. मात्र, हे सर्वजण महायुतीसोबतच असल्याचे आणि उपस्थितीची जबाबदारी पक्षाच्या समन्वयकाची असल्याचे सांगत संयोजक आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगून वेळ मारून नेली. मात्र, नगर जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती विचारात घेता याची राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा सुरू झाली आहे.

महायुतीच्या धोरणानुसार राज्यभर आज संयुक्त मेळावे झाले. नगरला विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा झाला. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार (आता अजितदादा गट) यांच्यातील लढतीची पूर्वीपासून चर्चा आहे. त्यामुळे दोघांमध्ये तीव्र राजकीय स्पर्धा सुरू आहे. अजित पवार यांच्या भाजपसोबत येण्याच्या निर्णयानंतरही त्यात बदल झाला नाही. त्यामुळे आजच्या महायुतीच्या मेळाव्यास आमदार लंके उपस्थित राहणार का? याकडे लक्ष लागले होते. अपेक्षेप्रमाणं आमदार लंके यांनी पाठ फिरवलीच. मात्र, सोबतच अजितदादा गटाचे अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे आणि कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांनीही मेळाव्याकडे पाठ फिरविली.

अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप फक्त उपस्थित होते. अर्थात जगताप आणि विखे हे दोघे अधीपासूनच शहराच्या विकासासाठी म्हणून एकत्र आलेले आहेत. एरवीही त्यांचे एकत्रित अनेक कार्यक्रम होत आहेत. त्यामुळे त्यांची उपस्थिती अपेक्षितच होती. याशिवाय अकोल्याचे भाजपचे माजी आमदार वैभव पिचड आणि शिवसेनेचे नगर शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी मेळाव्याकडे पाठ फिरवली. यासंबंधी प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील यांनी याला पक्षाच्या समन्वयकांना जबाबदार धरले.

विखे पाटील म्हणाले, ‘हा महायुतीचा मेळावा आहे. ज्या, त्या पक्षाची जबाबदारी आहे. पक्षाच्या समन्वयकाची यात मोठी जबाबदारी होती. पक्षाचे नेते, पदाधिकारी उपस्थित ठेवण्याची जबाबदारी होती. परंतु काही कारणास्तव ते राहिले नसतील, ते मला काय कारण माहीत नाही. पण हे आमदार पक्षापेक्षा, महायुतीपेक्षा वेगळी भूमिका घेतली, असे मला वाटत नाही’, असेही विखे पाटील म्हणाले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!