विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील यावेळची निवडणूक अत्यंत संघर्षाची होईल, असे एकूण वातावरण आहे. आज ही चूरस वाटत असली, तरी पुढे चालून याचे रुपांतर संघर्षात होण्याची शक्यता जास्त आहे. रिंगणातील दोन्ही प्रमुख उमेदवार हे प्रतिस्पर्धी नसून एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. उमेदवारच नव्हे तर त्यांचे कार्यकर्तेही तेवढेच आक्रमक असल्याने ही निवडणूक प्रशासनासाठी देखील पुढे चालून डोके दुखी ठरू शकेल.
लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर अहमदनगर मतदारसंघातून भाजपची उमेदवारी खा. डॉ. सुजय विखे यांनाच मिळणार, हे निश्चित होते. डॉ. सुजय विखे यांच्याशिवाय भाजपकडे तेवढा तगडा पर्यायही नव्हता. अंतर्गत धुसफूस असली तरी उमेदवारीच्या मागणीवरून त्यात फार रामायण घडेल अशातील स्थिती नव्हती. झालेही तसेच. माजी मंत्री राम शिंदे यांनी काही काळ उमेदवारीसाठी ताणून धरले असले तरी त्यांच्या मागणीची दखल वरिष्ठांपर्यंत किती घेतली जात होती, याबाबत साशंकता आहे. ते देखील मुळचे भाजपचे असल्याने वेगळा विचार करण्याची शक्यता नव्हती. मात्र विखे यांच्या विरोधात कोण,हा प्रश्न होताच. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पारनेरचे आमदार निलेश लंके अजित पवार गटात दाखल झाले होते.त्यामुळे या जागेवर दावा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे कोण उमेदवार असेल, याबाबत उत्सुकता होती. त्यावेळी आ. रोहित पवार, माजी मंत्री प्राजक्त तनपूरे यांच्या नावांची चर्चा झाली. मात्र हे दोघेही फारसे उत्सुक नसल्याचे त्यावेळी वातावरण होते.
आमदारकीचा राजीनामा देण्यापूर्वी पारनेरमध्ये लंके विरूद्ध विखे असा सामना रंगलेलाच होता. लंके यांनी विखे यांच्या विरोधात दंड थोपटायचा निर्णय घेतलाच होता. मात्र हे करत असतानाही ते सावध होते. आपली आमदारकी शाबूत ठेऊन त्यांना विखे यांच्या विरोधात लढत द्यायची होती. त्यासाठी त्यांनी आपल्या पत्नीला उमेदवारीसाठी पुढे केले. जेष्ठ नेते शरद पवार यांनी त्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगळा विचार केल्यास अपात्रतेची कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर लंके यांच्यासमोर पर्याय राहिला नाही. विखे यांनी मात्र आपल्यासमोर उमेदवार लंके हेच असतील,याचा अंदाज बांधून निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आवश्यक ती तयारी केली. पारनेर तालुक्यात लंके आमदार असताना झालेल्या प्रत्येक प्रकाराचे एक एक पुरावे त्यांनी तयार केल्याचे बोलले जाते. सुपे एमआयडीसी, वाळू प्रकरण, प्रशासनाला दिलेली वागणूक,कोविड काळातील वस्तुस्थिती असे बरेच पुरावे पुढील काळात प्रचारामध्ये समोर आले, तर नवल वाटायला नको.
लंके देखील ही निवडणूक सहजपणे घ्यायला तयार नाहीत. जशास तसे,हा त्यांचा बाणा प्रचार काळात उफाळून येण्याची शक्यता अधिक आहे. त्यातून सोशल मीडियावर सुरू असलेले युद्ध प्रत्यक्ष मैदानात यायला वेळ लागणार नाही. लंके आणि विखे या दोन्हीचे कार्यकर्ते तेवढेच आक्रमक आहेत. आतापासूनच टीकेची पातळी हळूहळू खालवायला सुरुवात झाली आहे. यात आरोप प्रत्यारोप आणि टिकेची भाषा जेवढी विकसित होत जाईल, तेवढे वातावरण तापत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढे नेमके काय वाढून ठेवले असेल,याची चिंता आतापासूनच प्रशासनाला पडली आहे.
भाजपमध्येही आलबेल नाही…
लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर खा. डॉ. सुजय विखे यांनी भाजपचे पदाधिकारी, नेते, प्रमुख कार्यकर्ते यांच्यासमोर माफीनामा सादर केला. मात्र त्यानंतरही काहींचे पुरेसे समाधान झालेले दिसत नाही. माजी मंत्री राम शिंदे यांनी विखे यांच्यासोबत उभा दावा घेतल्यानंतरही पक्षाचे काम प्रामाणिकपणे करणार असल्याची ग्वाही दिली. असे असले तरी त्यांचे आणि लंके यांच्यातील मैत्री साशंकता निर्माण करते. कारण या दोघांतील मैत्रीचा मुख्य धागा हा विखे विरोध हाच आहे.
अहिल्यानगर दक्षिणमध्ये लढत नव्हे, संघर्षच खा. विखे – आ. लंके यांच्यात वैयक्तिक विरोध जास्त

0Share
Leave a reply