वसंत रांधवण / विशेष प्रतिनिधी अहमदनगर : सध्या मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांनी रान उठविले आहे. मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळावे,या मागणीसाठी मनोज जरांगे हे पायी मोर्चाने मुंबई कडे निघाले आहेत. तर ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे. अशी भूमिका ओबीसी समाजाने घेतली आहे. या पार्श्वभूमीवर आता अहमदनगर मध्ये येत्या ३ फेब्रुवारीला ओबीसी महाएल्गार मेळाव्याचे आयोजन क्लेरा ब्रुस हायस्कूलच्या मैदानावर करण्यात आले आहे. या मेळाव्याची सध्या अहमदनगर मध्ये जय्यत तयारी सुरू असून मंगळवार दि २३ रोजी नियोजनाची सकल ओबीसी भटक्या विमुक्तांची बैठक टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात पार पडली.
या महाएल्गार मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ,आ. प्रकाश शेंडगे, कल्याण दळे, महादेव जानकर,आ. गोपीचंद पडळकर, टी.पी. मुंढे, अन्सारी शेख आदी ओबीसी नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत सकल ओबीसी भटक्या विमुक्तांचा महाएल्गार मेळावा संपन्न होणार आहे. या महाएल्गार मेळाव्याच्या तयारीसाठी नगरमध्ये सकल ओबीसी भटक्या विमुक्त आघाडीच्या नेत्यांची नियोजन बैठक माजी आ. पांडुरंग अभंग यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
याप्रसंगी जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, राहुरी,राहाता, श्रीरामपूर, नेवासा, कोपरगाव, कर्जत, जामखेड, पाथर्डी, संगमनेर, अकोले आदी तालुक्यातील बारा बलुतेदार, माळी, साळी, धनगर, वंजारी, कुंभार, सुतार, चर्मकार, वडार, सुवर्णकार, शिंपी, लोणार आदी समाजातील ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी आ.पांडुरंग अभंग म्हणाले, ओबीसींचे २७ टक्के आरक्षण अबाधित राहावे. ओबीसींच्या आरक्षण संरक्षित करण्यासाठी ओबीसी समाजाने एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण हे धोक्यात आले आहे. ओबीसींच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागू नये, यासाठी नगर शहरामध्ये महाएल्गार मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यासाठी नगर जिल्ह्यातून पाच लाख ओबीसी बांधव उपस्थित राहतील, असे त्यांनी यावेळी सांगितले.
नगरमध्ये ३ फेब्रुवारीला सकल ओबीसी भटक्या विमुक्तांचा महाएल्गार, मंत्री छगन भुजबळ यांची तोफ धडाडणार

0Share
Leave a reply